रविवार, १८ मार्च, २०१८

गुढीपाडव्याचे कालगणनेतील महत्व



कालगणनेसाठी माणूस प्राचीनकाळापासून चंद्रसूर्यावर अवलंबून राहिला आहे. या दोन ग्रहांच्या बाबतीत होणाऱ्या ठळक आणि नियमित घटनांचा वापर आपण कालगणना करण्यासाठी वापरतो. दिवस मोजण्यासाठी सूर्योदय-सूर्यास्तांचा वापर होतो. महिने मोजण्यासाठी पौर्णिमा आणि अमावास्यांचा वापर होतो, सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायनाचा वापर वर्षे मोजण्यासाठी करतो. परंतु यांचा एकमेकांत ताळमेळ घालताना थोडी तडजोड करावी लागते, दिन, मास आणि वर्षे हे काळ एकमेकांचे चपखल गुणाकारात बसत नाहीत. दोन पौर्णिमांमध्ये किंवा दोन अमावास्यांमध्ये किती सूर्योदय आणि सूर्यास्त बसतात याचे उत्तर पूर्णांकात येत नाही, तसेच सूर्याच्या दोन उत्तरायणांत किती पौर्णिमा किंवा अमावास्या होतात हे ही पूर्णांकातले उत्तर नव्हे.

दिवसरात्र आणि चांद्रमास यांचा मेळ घालण्यासाठी आपण तिथींचा वापर करतो. चंद्र-सूर्यामधील अंशात्मक अंतराला बाराने भागले असता एक तिथी होते, अशा तीस तिथी दोन पौर्णिमांमध्ये असतात. साधारणपणे दर सूर्योदयाला तिथी बदलत असल्याने, एका तिथीचा काळ हा एका सौरदिनाइतका असतो. काहीवेळा एखादी तिथी दोन सूर्योदय व्यापून टाकते, तिला वृद्धितिथी म्हणतात. काहीवेळा एखादी तिथी एका सूर्योदयानंतर सुरू होऊन त्यालगतच्या सूर्योदयाआधीच संपते, तिला क्षयतिथी म्हणतात. हे अपवाद सोडले तर तिथींचा वापर करून आपण चांद्रमास आणि सौरदिन यांचा ताळमेळ घालतो. तिथी ओळखण्यासाठी सरळसरळ अंकांचा वापर करतात. अमावास्या किंवा पौर्णिमेनंतरची पहिली तिथी प्रतिपदा किंवा प्रथमा, नंतरची द्वितीया, नंतर क्रमाने तृतीया, चतुर्थी वगैरे तिथी येतात.

चांद्रमास आणि सौरवर्ष यांचा ताळमेळ आपण सौरमासांचा वापर करून घालतो. चांद्रमासांची नावे मात्र अंकांचा वापर करून केलेली नाहीत. त्यासाठी आपण नक्षत्रांचा वापर करतो. २७ नक्षत्रांपैकी चित्रा (चैत्र), विशाखा (वैशाख), ज्येष्ठा (ज्येष्ठ), पूर्वा/उत्तराषाढा (आषाढ), श्रवण (श्रावण), पूर्वा/उत्तराभाद्रपदा (भाद्रपद), अश्विनी (अश्विन), कृत्तिका (कार्तिक), मृगशीर्ष (मार्गशीर्ष), पुष्य (पौष), मघा (माघ) आणि पूर्वा/उत्तराफाल्गुनी (फाल्गुन) या नक्षत्रांचा वापर महिन्यांच्या नावासाठी करतात (कंसात महिन्यांची नावेही लिहिली आहेत.). पौर्णिमेच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्राजवळ असेल त्या नक्षत्राच्या नावाने, त्या पौर्णिमेच्या लगतच्या दोन अमावास्यांमधील मास ओळखला जातो. उदा. ज्या पौर्णिमेच्या वेळी चंद्र जेव्हा चित्रा नक्षत्राजवळ असतो, त्या पौर्णिमेच्या लगतच्या अमावास्यांमधील काळ चैत्र महिन्याचा असतो. साधारणपणे असे बारा चांद्रमास उत्तरायण आणि दक्षिणायन मिळून असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन मिळून होणाऱ्या एका सौरवर्षात साधारणपणे बारा चांद्रमास असतात, आणि या काळात सूर्याची सर्व बारा राशींमधून एक चक्कर पूर्ण होते. म्हणजेच साधारणपणे एका चांद्रमासाचा काळ हा सूर्याला एका राशीतील भ्रमणाइतका असतो. सूर्याच्या एखाद्या राशीतील भ्रमणाला संक्रांत असे म्हणतात. अशा बारा संक्रांती एका सौरवर्षात होतात. साधारणपणे एका चांद्रमासात एक संक्रांत येते. काहीवेळा एका चांद्रमासात दोन संक्रांती येतात, त्याला क्षयमास म्हणतात. काहीवेळा पूर्ण चांद्रमासात एकही संक्रांत येत नाही, त्याला अधिकमास म्हणतात.

महिना कधी सुरु व्हावा यात फारसे वाद आढळत नाहीत. अमावास्येनंतर चंद्र पुन्हा दिसायला लागतो, हा चांद्रमास सुरू होण्यासाठी उत्तम संकेत असल्याने बहुतेक कालनिर्णयांच्या पद्धतीत अमावास्येनंतरच्या दुसऱ्या दिवशी चांद्रमास सुरु होतो. काही कालगणनांमध्ये पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेलाही चांद्रमास सुरु करतात. चांद्रमास सुरु होण्याच्या या दोनच पद्धती प्रचलित आहेत. परंतु वर्ष कधी सुरु करावे यात मात्र फार मतभेद आहेत. सूर्याच्या भ्रमणात वसंतसंपात (vernal equinox) म्हणजे उत्तरायणातील दिवसरात्रीमान एकसारखे असण्याची वेळ, उत्तरायण संपून दक्षिणायन सुरु होते ती वेळ (summer solstice), शरदसंपात (autumnal equinox) म्हणजे दक्षिणायनातील दिवसरात्रीमान एकसारखे असण्याची वेळ आणि दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होण्याची वेळ (winder solstice) हे महत्त्वाचे बिंदू आहेत. ते क्रमश: सायन मेष, कर्क, तूळ आणि मकर संक्रांतींशी संबंधित आहेत. साधारणपणे यातील एका बिंदूपासून सौरवर्षाची सुरुवात करण्याचा प्रघात आहे. भारतात किंवा उत्तरध्रुवावरील बहुतेक ठिकाणी वसंतसंपाताच्यावेळी पानगळ संपून नवी पालवी यायला सुरुवात होते. अमावास्येनंतरच्या प्रतिपदेला जसा चंद्र दिसायला सुरुवात होते हे शुभ मानले जाते, तसेच वसंतागम निसर्गातील या बदलामुळे शुभ मानला जातो. या कारणाने बहुतेक ठिकाणी सौर वर्षाची सुरुवात वसंतसंपातापासून मानतात.

मात्र वसंतसंपाताच्या वेळी अमावास्या होऊन नवा चांद्रमास सुरु होईलच असे नक्की नसते. वसंतसंपाताच्यावेळी चालू असलेल्या चांद्रमासातील कुठलीही तिथी तेव्हा चालू असू शकते. त्यामुळे चांद्रवर्ष आणि सौरवर्ष हे एकावेळी सुरु होत नाही. परंतु दिवसरात्रींचे चक्र आणि चांद्रमास यांचा मेळ जसा पौर्णिमा-अमावास्येचा वापर करून करतात, तासाच चांद्रमास आणि सौरवर्ष यांचाही मेळ पौर्णिमा/अमावास्येचा वापर करूनच करतात. अमावास्या पौर्णिमा या फारच ठळक घटना आहेत, त्यांचा अगदी सामान्य जनांनासुद्धा बोध होतो. परंतु वसंतसंपात, शरदसंपात, दक्षिणायन अथवा उत्तरायणाची समाप्ती या त्या मानाने सूक्ष्म घटना आहेत. त्यांचा सामान्य जनांना बोध होईलच असे नाही. त्यामुळे या विशिष्ट बिंदूच्या जवळच्या पौर्णिमा अमावास्येचा उपयोग नव्या वर्षाची सुरुवात करण्यास करतात. वसंतसंपाताच्या वेळी जो चांद्रमास चालू होतो तो चांद्रवर्षाचा पहिला मास समजतात. सध्या वसंतसंपताच्या सुमारास चैत्र हा चांद्रमास सुरु होतो, त्यामुळे चैत्राच्या शुक्लप्रतिपदेला नवे संवत्सर सुरु होते. हाच गुढीपाडवा होय.  नव्या चांद्रवर्षाची किंवा संवत्सराची सुरुवात करण्यासाठी गुढीपाडव्याचा सण  चैत्र शुद्ध प्रतिपदेस साजरा करतात.

गुढीपाडव्याचे महत्व इथेच संपत नाही. पृथ्वीच्या कललेल्या अक्षाच्या अयनामुळे चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यातील हा मेळ फार टिकत नाही. या अयनामुळे वसंतसंपाताच्या वेळी सूर्याची पृथ्वीवरून दिसणारी स्थती दरवर्षी सूक्ष्मपणे बदलत असते. याला संपातचलन किंवा अयनचलन (precession of equinox) असे म्हणतात. यामुळे सध्या जरी वसंतसंपाताच्या आसपासच्या पौर्णिमेचा चंद्र चित्रा नक्षत्राजवळ दिसत असला म्हणजेच वसंतसंपाताच्या आसपास चैत्रमास चालू होत असला तरीही आणखी काहीशे वर्षांनी तसे होणार नाही. कधीतरी वसंतसंपाताच्या आसपास फाल्गुनमास चालू होईल, नंतर माघमास असेल. तेव्हा चांद्रमास आणि सौरमास यांचा मेळ घालण्यासाठी चांद्रवर्षाच्या सुरुवातीचा चांद्रमास बदलेल. आज जसे चांद्रवर्ष चैत्रमासाने सुरु होते, तसे ते भविष्यात फाल्गुन किंवा माघाने सुरु होईल. तेव्हा चैत्र शुद्ध प्रतिपदा ही चांद्रवर्षाची सुरुवात न राहता, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा किंवा माघ शुद्ध प्रतिपदा ही चांद्रवर्षाची सुरुवात होईल. सामान्य जनांना हे सूक्ष्म गणित कळणे अवघड आहे, पण कालगणनेसाठी हा मेळ आवश्यक आहे. जर चांद्रवर्षाची सुरुवात सणाने केली तर सामान्य जनांना नवे चांद्रवर्ष सुरु कधी झाले हे कळणे सोपे जाईल. याचा विचार करून पूर्वीच्या शास्त्रकारांनी गुढीपाडवा या सणाची योजना करून ठेवली आहे. वेळोवेळी वसंतसंपाताचे चलन पाहून त्यानुसार गुढीपाडव्याचा मुहूर्त बदलून चांद्र आणि सौरवर्षाचा मेळ घालणे सोयीचे ठरेल.

आज महाराष्ट्रात गुढीपाडवा या सणाबद्दल बरेच उलटसुलट विचार चालू आहेत. त्यात एक मुद्दा असा पुढे केला जातो की चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी सणाची तिथी असल्याचे उल्लेख फार पूर्वीच्या ग्रंथांत (उदा. महाभारत, रामायण) दिसत नाहीत वगैरे, त्यामुळे ही तिथी म्हणजे गुढीपाडवा नाही. हे निरीक्षण जरी बरोबर असले तरीही निष्कर्ष चुकीचा आहे. वर स्पष्ट केल्याप्रमाणे वसंतसंपात सतत बदलत असल्याने, महाभारत आणि रामायण काळी तो चैत्र महिन्याच्या सुरुवातीलाच येत असेल असे नाही, परंतु त्यावेळीही वसंतसंपाताच्या जवळपासच्या चांद्रमासाच्या सुरुवातीला नववर्षाची सुरुवात साजरी करण्याचा प्रघात होता. त्यामुळे तत्कालीन गुढीपाडवा चैत्रापेक्षा इतर कुठल्यातरी महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला होत असला पाहिजे. सांप्रतकाळी वरील स्पष्टीकरणाप्रमाणे तो चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच होणे योग्य आहे.

शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

संततिसाठी नियोजन




"भाग्यसंकेत" या ज्योतिष विषयाला वाहिलेल्या नामांकित मराठी नियतकालिकाच्या २०१५ सालच्या दिवाळी अंकात माझा "संततिसाठी नियोजन" या नावाने एक लेख प्रसिद्ध झाला होता. सध्याच्या काळात विवाहानंतर जोडप्याला एकमेकांसाठी वेळ देणं, त्यांच्या व्यसाय किंवा नोकऱ्या, त्यानिमित्ताने देश, शहरं बदलणं किंवा आर्थिक सुबत्ता आणि मुलं सांभाळण्याची परिस्थिती येईपर्यंत वाट पाहणं यात विवाहानंतर बराच काळ निघून जातो. योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर संततिसाठी प्रयत्न सुरु होतात. पण हवी असून संतति होतेच असे नाही किंवा संतति होण्यास बरीच वाट पहावी लागते. अनेक पत्रिकांच्या अभ्यासातून केलेल्या निरीक्षणांतून यामागील कारणे आणि उपाय यांचा उहापोह या लेखात केला आहे. ज्योतिषाच्या मदतीने संततिसाठी नियोजन करण्याचा विचार मी या लेखात मांडला आहे. या लेखाच्या शेवटी, विवाहासाठी वधुवरांची पत्रिका पाहतानाच ज्योतिषाशी संततिसाठी नियोजनाबाबत चर्चा करण्याचा वेगळा विचार मी मांडला आहे. 

सामान्यपणे जातकाच्या पत्रिकेत संततिसाठी अनुकूल काळ पुरेसा असतो, कुठलेही ज्योतिष न पाहता अनुकूल काळात संततिचे नियोजन विनासायास होते आणि संततिही होते. परंतु काही पत्रिकांमध्ये हा काळ विवाहानंतर योग्य वयात कमी असतो, किंवा प्रतिकूल काळ जास्त असतो. अशावेळी मात्र पत्रिका पाहून वेळच्या वेळी नियोजन केल्यास संततिबाबत निराश होणे पदरी येत नाही. हा लेख वाचून एक साखरपुडा झालेले जोडपे माझ्याकडे आले आणि त्यांनी संततिनियोजनाबाबत प्रश्न विचारले. त्यांतील वधूच्या पत्रिकेत संततिला अनुकूल काळ खूप कमी असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांनी संततिचा निर्णय लांबविला तर त्यांना उशीरा संतति होईल किंवा न होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्यांचा विवाह डिसेंबर २०१६ मध्ये होणार होता आणि सुदैवाने विवाहानंतर २०१७ च्या दिवाळीच्या सुमारास संतति होण्याचे योग होते. विवाहानंतर लगेचच संतति झाल्यास मोकळा वेळ मिळणार नाही म्हणून ते थोडे नाराज झाले, परंतु मी समजावल्यानंतर विवाहानंतर नियमन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी मला दिवस गेल्याची गोड बातमी दिली आणि काही दिवसांपूर्वी बाळ बाळंतीण सुखरूप असल्याची बातमी देखील. संतति न झाल्याने निराशाग्रस्त झाल्यावर ज्योतिषाची मदत घेण्यापेक्षा हा पर्याय चांगला नाही का?

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

दुभंगलेले सण

अश्विनी पौर्णिमेला मोठ्या मुलाला (आणि आजच्या काळात मुलीला) ओवाळून काहीतरी कपडा, साधारणपणे पांढरा, देण्याची पद्धत बऱ्याच मराठी कुटंबांमध्ये आहे. “अश्विनी आज करू का उद्या?”, असा प्रश्न या वर्षी कोजागिरीला बऱ्याच जणांनी विचारला. नेहमी एकाच दिवशी येणारे हे सण यावर्षी दोन लागोपाठच्या दिवशी आले आहेत. २०१६-१७ च्या पंचांगात, कालनिर्णयमध्ये, कोजागरी पौर्णिमा १६ ऑक्टोबरला आणि अश्विनी पौर्णिमा १७ तारखेला लिहिली आहे. त्यामुळे हा गोंधळ होणे स्वाभाविक आहे. विशेषत: २०१६ या वर्षी नेहमी एकाच दिवशी येणारे अनेक सण दोन लागोपाठच्या दिवशी आले आहेत - नारळी पौर्णिमा १७ ऑगस्टला तर राखीपौर्णिमा १८ ऑगस्टला, नवरात्री/सरस्वती विसर्जन १० ऑक्टोबरला तर दसरा ११ ऑक्टोबरला. असं का? हा प्रश्न चिकित्सक मनाला पडणं साहजिक आहे; त्याचं उत्तर देण्यासाठी हा लेखप्रपंच!

हिंदू सण हे सूर्यचंद्रांच्या आकाशातील स्तिथीवर आधारित आहेत. ही स्थिती सूर्याच्या स्थितीवरून ठरणारा महिना (मास) आणि चंद्राचे त्याच्यापासूनचे अंतर दाखविणारी तिथी यांच्यावरून पाहतात. चंद्राचे सूर्यापासूनचे कोनीय अंतर ० अंशांपासून १८० अंशांपर्यंत आणि नंतर ३६० अंशापर्यंत रोज बदलत जाते. ते ० (किंवा ३६०) अंश असते तेव्हा अमावास्या असते आणि १८० अंश असते तेव्हा पौर्णिमा. हे अंतर एकूण ३० भागांमध्ये विभागले तर प्रत्येक १२ अंशाच्या भागाला एक तिथी म्हणतात. प्रत्येक सणाची तिथी आणि मास ठरलेला आहे. उदा. कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी करतात, राखीपौर्णिमा श्रावणातील पौर्णिमेला साजरी करतात वगैरे. साधारणपणे चंद्राच्या गतीमुळे एक तिथी जवळजवळ एक दिवस म्हणजे २४ तास चालते, परंतु हा काळ सूर्यचंद्रांच्या स्थितीनुसार बदलतो, त्यामुळे कधी कधी तिथी २४ तासांपेक्षा जास्त तर कधी २४ तासांपेक्षा कमी काळ राहते. या फरकामुळे, दर सूर्योदयाला तिथी बदलत नाही तर ती दिवसात कधीही बदलते. त्यामुळे पंचांगात किंवा दिनदर्शिकेत प्रत्येक तिथीची समाप्तीची किंवा सुरु होण्याची वेळ, सूर्योदयापेक्षा वेगळी आढळून येते.

याबरोबरीने दुसरी एक महत्त्वाची बाब पहावी लागते; ती म्हणजे, सणाचे प्रयोजन! त्यानुसार तो सण सूर्योदयानंतर साजरा करायचा की सूर्यास्तानंतर हे ठरते. महाशिवरात्री, नारळी पौर्णिमा, दिव्याची अमावस्या, नवरात्री, कोजागिरी पौर्णिमा हे सण रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर साजरे करायचे सण आहेत. या सणांना साधारणपणे रात्र जागवून ध्यानधारण करणे वगैरे शांतपणे करायच्या गोष्टी होणे अपेक्षित असते. दसरा, अश्विनी पौर्णिमा, गणेश चतुर्थी, गुढीपाडवा हे सण दिवसा म्हणजे सूर्योदयानंतर साजरे करायचे आहेत. या सणांना दैवताची प्राणप्रतिष्ठापना, ओवाळणे वगैरे धामधुमीच्या गोष्टी करणे अपेक्षित असते. जे सण रात्री साजरे करायचे आहेत त्यांच्यासाठी सूर्यास्ताच्या वेळची तिथी पाहतात तर जे सूर्योदयानंतर साजरे करायचे आहेत त्यांच्यासाठी सूर्योदयाच्या वेळची तिथी पाहतात. ज्या तिथीला दोन्ही प्रकारचे सण साजरे होतात, ती तिथी त्या दिवशीच्या सूर्योदयाआधी सुरू होऊन सूर्यास्तानंतर संपत असेल तर दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होतात. पण जर ती तिथी सूर्योदयानंतर सुरू होत असेल तर रात्री साजरा होणारा सण त्याच दिवशी सूर्यास्तानंतर आणि दिवसा साजरा होणारा सण त्याच्या पुढच्या दिवशी तिथी चालू असेपर्यंत साजरा करतात. २०१६ साली अश्विन पक्षातील पौर्णिमा १६ ऑक्टोबरला दुपारी १ वाजून २६ मिनिटांनी चालू होऊन १७ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी संपली, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा १६ तारखेला रात्री साजरी केली तर अश्विनी पौर्णिमा १७ तारखेला दिवसा! त्याच वर्षी श्रावणातील पौर्णिमा १७ तारखेला दुपारी ४ वाजून २७ मिनिटांनी सुरू झाली आणि १८ तारखेला दुपारी २ वाजून ५७ मिनिटांनी संपली. त्यामुळे नारळी पौर्णिमा १७ तारखेला रात्री आणि राखी पौर्णिमा १८ तारखेला सकाळी साजरी केली.

भारतात असे विशेषकरून लिहिण्याचे कारण म्हणजे, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा स्थानाप्रमाणे बदलत जातात, परंतु तिथी सुरू होण्याच्या आणि समाप्तीच्या वेळा मात्र सर्व ठिकाणी सारख्याच असतात. अगदी अचूक लिहायचे झाले तर प्रत्येक ठिकाणच्या सुर्योदय आणि सूर्यास्ताच्या UTC वेळा बदलतात कारण त्या ठिकाणच्या अक्षांशरेखांशावर अवलंबून असतात. पण तिथी सुरु होण्याच्या आणि संपण्याच्या वेळा मात्र अक्षांश आणि रेखांशावर अवलंबून नसल्याने त्यांच्या UTC वेळा ह्या सर्व ठिकाणी सारख्याच असतात. याचा परिणाम म्हणून भारतात जी तिथी सूर्योदयानंतर सुरू होईल ती यरोपमध्ये सूर्योदयापूर्वी सुरू झालेली असू शकते. यामुळे भारतात जे सण सलग दोन दिवशी साजरे होतील, ते युरोपमध्ये एकाच दिवशीही साजरे होऊ शकतात.

दुभंगलेल्या सणांमागचे हे कारण स्पष्ट झाले असेल अशी आशा करतो. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

राहु पितरांचा दर्शक

आपल्या ज्ञात अज्ञात पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी शास्त्रकारांनी भाद्रपदमासातील कृष्णपक्षाची योजना केली आहे. या काळात कुळाचाराप्रमाणे श्राद्धाचे विहित कर्म करून पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. आधुनिक काळात आपापल्या श्रद्धेप्रमाणे, सोयीप्रमाणे पितरांचे स्मरण करण्याच्या नव्या रुढी पडत चालल्या आहेत. आपल्या पूर्वजांकडून आपण संपत्ती, गुणदोष, चालीरीती, संस्कार अशा अनेक गोष्टी कळत नकळत घेत असतो. आपल्या हातून घडणाऱ्या चांगल्या वाईट कर्मांमध्ये या वारशाचा वाटा असतो, त्याची कृतज्ञता म्हणून पितरांचे स्मरण करणे गरजेचे असते. जगाच्या पाठीवरील प्रत्येक धर्मात, संस्कृतीत काही ना काही प्रकारे पूर्वजांचे स्मरण केरण्याची प्रथा आहे ती यासाठी.

फलज्योतिषात राहूवरून पितामह किंवा पितर, पूर्वज पाहतात, पिढीजात शाप पाहतात. धनस्थानापासून घराणे पाहतात. या दोन गोष्टींवरून पितरांकडून आलेला वारसा दिसून येतो. पत्रिकेत राहूचे विशिष्ट योग असतील तर अशावेळी पूर्वजांचा मागोवा घ्यावा लागतो. आजच्या काळात या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवला जात नाही. मीही ह्या शक्यतांचा विचार शेवटी करत असे परंतु माझ्याकडे आलेल्या काही जातकांच्या अनुभवांनी हा विचार बदलायला लावला. त्यातील काही पुढे देत आहे. शेवटी प्रत्यक्ष ज्ञान तर्कालाही हरवते.

संकेतच्या घरात अचानक आजारपणे, अपघात, भांडणे सुरु झाली. त्यामागचे कारण सापडत नव्हते. त्याच्या पत्रिकेत चतुर्थस्थानी चंद्र राहु युती होती, चंद्र राहु दशेत या युतीवरूनराहूचे गोचर भ्रमण सुरु होते. संकेतला मी त्यावर्षीचे श्राद्ध करण्याचे राहिले आहे का असे विचारले. संकेतच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या घरात श्राद्ध कधीच होत नव्हते, पण दरवर्षी ते पितरांचे स्मरण करून काही रक्कम देणगी म्हणून देत असत ती या वर्षी द्यायची राहिली होती. काही आर्थिक अडचणींमुळे तसे करणे शक्य झाले नव्हते. मी वर म्हणल्याप्रमाणे श्राद्ध याचा अर्थ पितरांचे स्मरण करून केलेले कर्म असा आहे; संकेतच्या पत्रिकेने मला त्या कर्मात पडलेला खंड बिनचूक दाखविला होता. ग्रहदशा आणि गोचर यामुळे हे कर्म राहून गेले की कर्म राहून गेल्याने अशा ग्रहस्थितीमुळे घरात वाईट घटना घडू लागल्या हे सांगणे अवड आहे.

संकेतचा प्रश्न लवकर सुटला. दरवेळी प्रश्न सुटतातच असे नाही. नीरजाबाईंना त्यांच्या नवऱ्याकडून आणि भावाकडून त्रास भोगावा लागत होता, त्यांच्या मुलीचा घटस्फोट होऊ घातला होता. त्यांच्या पत्रिकेत बुध राहु केंद्रयोग आणि त्यांच्या मुलीच्या पत्रिकेत बुध राहु युती होती. बुधाचा दोन्ही ठिकाणी धनस्थानाशी संबंध होता. मी त्यांना त्यांच्या घरात कोणाचा घातपाताने किंवा छळाने मृत्यू झाला आहे का हे विचारले. त्यांना आश्चर्य वाटून त्यांनी त्यांच्या आत्याने घरी होणाऱ्या छळाला कंटाळून जाळून घेतल्याचे सांगितले. बुध तरुण माणूस विशेषत: मुंजा मुलगा (मुंज होऊन लग्न न झालेला) दाखवतो. बुधावरून आत्या दिसत नाही, म्हणजे आत्याचाही छळ झाला तो अशा तरुण मुलाच्या/मुलीच्या मृत्यूचा परिपाक होता. अशावेळी मूळ कळल्याशिवाय उपाय करता येत नाही. सर्वपित्री श्राद्ध करूनही संकट टळत नाही. मी त्यांना अशा घटनेचा शोध घ्यायला सांगितला. परंतु आजवर तो शोध लागलेला नाही, भोगही संपलेले नाहीत.

सानिका आणि तिच्या नवऱ्याच्या दोघांच्या पत्रिकेत मंगळ राहुचे षष्ठ, व्यय स्थानातून योग होते; सानिकाच्या पत्रिकेत मंगळ, राहू प्रतियुती आणि तिच्या नवऱ्याच्या पत्रिकेत मंगळ राहु व्ययातील युती. मंगळ, राहू युती घरातील विधवा स्त्री, विशेषत: जिला घरात चांगली वागणूक मिळालेली नाही अशी, दाखवते. अशी युती जर षष्ठ, व्यय स्थानात असेल तर त्या स्रीच्या तळतळाटातून वाईट फळे मिळतात. पूर्वी घराघरातून अशा स्त्रिया असत, पण सध्याच्या काळात हे अभावाने आढळते. मी सानिकाला ही शक्यता बोलून दाखवली. तिने चौकशी केली असता तिच्या आजेसासूबाईंच्या बाबतीतच असे घडले असल्याचे आढळले. मागच्या अनुभवावरून काही वाईट घटना घडण्याआधीच तिला त्यांच्या स्मरणार्थ श्राद्ध किंवा दान किंवा इतर कर्म करण्यास सांगितले आहे.

शुक्रवार, १० जुलै, २०१५

नात्यातील गैरसमज - ज्योतिषाची मदत

अरविंद (नाव बदलेले आहे) माझ्याकडे त्याच्या मोठ्या बहिणीशी सध्या संबंध नीट नाहीत अशी तक्रार घेऊन आला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे नक्की काय बिघडले होते हे त्याला कळत नव्हते. त्याने प्रश्न विचारला तेव्हाची पत्रिका मी मांडली (प्रश्नकुंडली १).
प्रश्नकुंडली १: ५ ऑक्टोबर, २०१३, १२:०४, पुणे

प्रश्नकुंडलीत प्रश्न, त्यासंबंधीची सर्व परिस्थिती यांचे प्रतिबिंब असते. मग ती परिस्थिती भूत, वर्तमान किंवा भविष्य या कुठल्याही काळातील असो. मोठे बहिण किंवा भाऊ लाभस्थानावरून पाहतात. चंद्र दशमात म्हणजे लाभाच्या व्ययात त्यामुळे मोठ्या बहिणीशी बिघडलेल्या संबंधाविषयी प्रश्न आहे दिसत होतं. त्याचप्रमाणे अष्टमातला चंद्र मानसिक ताणही दाखवत होता. त्यात चंद्र स्वनक्षत्रात, शुक्राच्या उपनक्षत्रस्वामीमध्ये, शुक्र लाभेश, स्त्रीदर्शक ग्रह, प्रश्नाची सर्व ओळख पटली. आता निदान करायचं होतं.

या कुंडलीत शुक्र, मंगळ केंद्रयोग आहे. शुक्र लाभेश आणि मंगळ पंचमेश, म्हणजे लाभाचा सप्तमेश. लाभस्थान मोठ्या बहिणीचं तर पंचमस्थान तिच्या पतीचं. त्यात ते शुक्र मंगळ म्हणजे विवाहसौख्याशी (की असौख्याशी) संबंधित ग्रह. मी अरविंदला त्याच्या बहिणीचे तिच्या पतीशी संबंध कसे आहेत हे विचारलं. असे नसते अगोचरपणे ज्योतिषाला करावेच लागतात. प्रश्नकुंडलीने दाखविलेल्या शक्यता पडताळूनच उत्तरं मिळतात. आश्चर्यचकित होऊन त्याने मला त्यांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाल्याचं सांगितलं. दशमाचा उपनक्षत्रस्वामी राहु स्वनक्षत्रात, लाभात लाभाशी युती करताना दिसला. राहु अशा स्थतीत गैरसमज, मनात दाटलेली काळोखी, जळमटे दाखवितो. मी अरविंदला त्यांच्यात काहीतरी गैरसमज झाल्याचे सांगितले. हे गैरसमज तिच्या वैवाहिक आयुष्यातील दु:खद घडामोडींमुळे आहेत ह्याची कल्पना दिली.

"मग आता काय करू? हे नातं पुन्हा कसं जुळवू?", अरविंदने विचारलं. प्रश्नकुंडली, प्रश्न दाखवते, त्याची पार्श्वभूमी दाखविते, आणि उत्तरंही देते. लाभाचा उपनक्षत्रस्वामी बुध दशमात पडलेला दिसला. तो दशमात असला तरीही लाभाशी होऊ घातलेल्या युतीत होता. बुध वाणी, संवादाचा कारक आहे. मी अरविंदला, स्वत: मागील सर्व गोष्टी विसरून बहिणीशी मोकळेपणाने बोलायला सांगितलं. अरविंदला अशा बोलण्यातून गैरसमज आणखी वाढतील का अशी चिंता पडली होती. मजा अशी की दशमाचा उपनक्षत्रस्वामी लाभातून दशमात चालला होता आणि लाभाचा उपनक्षत्रस्वामी दशमातून लाभात. स्वस्थानी जाणाऱ्या या ग्रहांनी, दोघे बहिण-भाऊ आपले मतभेद विसरून एकत्र येणार, हे मला निसंदिग्धपणे दाखवलं, आणि त्याप्रमाणे ते झालंही!

ग्रहदेखील न बोलता आयुष्यातलं नाट्य किती समर्थपणे दाखवतात? पहायला जरा कवीचं हृदय हवं इतकंच!

रविवार, २२ मार्च, २०१५

India Vs Bangladesh: prediction using astrology

I am not a cricket follower, but I like it because it helps me study astrology. My friends, relatives feed me with questions about these matches. World Cup 2015 is no different. "Will XYZ win the match?" is a common question.

For such questions, here are the rules (simplified) as per Krishnamurti system.
1. XYZ is represented by the ascendant and the seventh house indicates the opposite team/player. The sixth house being the twelfth to seventh, indicates the losses to opposite team and hence the sixth house is of prime importance in the horary charts.
2. If the Moon is significator of the sixth house, the horary chart provides the correct answer.
3. Whether XYZ will win or not, is indicated by the sub-lord of the sixth house. If the sub-lord is significator of the sixth, tenth (house related to one's accomplishments) or eleventh (house indicating one's desires and gains) house, XYZ wins, otherwise it looses.
4. Other rules like rules for retrograde planets are applicable here too.

Three different people, at three different moments asked me, "Whether India will win in the quarter final match against Bangladesh?". Follows the analysis of the horary charts
Chart 1: 18/Mar/2015 16:01:00, Pune

Chart 1 has the Moon in the star of Mars and is significator of houses 1, 7, 5, 9, and 10. Since it's not significator of the 6th house, I told that I can not answer this question at that moment. Sub-lord of the sixth house is the Sun, posited in the star of Saturn, who is retrograde. So, if I had to chosen to answer the question, I would have answered that India will loose, which would have been a wrong answer. India did win the match.

Chart 2: 19/Mar/2015 10:41:00, Pune
Chart 2 has the Moon in the star of Rahu and is signficator of houses 2, 3, 5, and 10. Since it's not significator of the sixth house, again I did not answer the question. The sub-lord of the sixth house is Jupiter, who is retrograde and is posited in the star of Mercury. Since retrograde Jupiter is significator of 10th and 11th house, I would have answered (if chosen to answer) that India will win the match after Jupiter gets into direct motion i.e. after 9th April. A one day match would never have stretched that far and I would have been a laughing stock.

Chart 3: 19/Mar/2015 08:49:00, Pune
Chart 3 has the Moon in the star of Rahu, who is posited in the sixth house. Now I could answer the question. Rahu is also sub-lord of the sixth house and is also significator of sixth house. So, I answered that India will win the match. By the way, Rahu also indicated that the batsmen on both sides will disappoint. Indian batsmen lost wickets easily and Bangladeshi batsmen couldn't even cross 200.






This method doesn't help betting. If the person who is betting is bound to loose money, an astrologer can not predict the winner. So, if somebody asks whether XYZ will win or not with the purpose of betting, the horary chart will show the outcome of the bet and not the outcome of match. If the outcome of the bet and the outcome of the match do not concur, astrologer's prediction will be falsified.

शनिवार, २१ मार्च, २०१५

भारत विरुद्ध बांग्लादेश, कोण जिंकेल? प्रश्नकुंडलीतील प्रश्नाचे महत्त्व

ज्योतिष शिकताना महत्वाचा म्हणजे सराव. तो मला घरच्यांकडून आणि मित्रांकडून भरपूर मिळत आलेला आहे. मला वास्तविक क्रिकेटमध्ये फार रस नाही, पण क्रिकेटच्या स्पर्धा सुरु झाल्या (हल्ली त्या वर्षभर चालूच असतात) की हे लोक मला सामन्यांचा निकालाबाबत प्रश्न विचारतात. अशा प्रश्नांमधून ज्योतिषाचे प्राथमिक धडे पक्के होतातच, पण ज्योतिषातील नियमांचे वस्तुनिष्ठ परीक्षण करायला भरपूर वाव मिळतो. त्याचे एक उदाहरण म्हणजे, परवाचा भारत विरुद्ध बांग्लादेश सामना!

एखाद्या सामन्यात इच्छित संघ/खेळाडू जिंकेल का? प्रकारच्या प्रश्नांमध्ये कृष्णमूर्ती ज्योतिषाचे नियम खालीलप्रमाणे आहेत
१. लग्नस्थान हे जो जिंकेल का असा प्रश्न आहे त्याचे आणि सातवे स्थान हे विरोधी संघाचे/माणसाचे धरावे. विरोधी संघ हरतो, म्हणजे त्याचे व्यय स्थान फलित होते, म्हणून हा प्रश्न सहाव्या (सातव्याचे व्ययस्थान) स्थानावरून सोडवतात.
२. प्रश्नकुंडलीत चंद्र सहाव्या स्थानाचा कारक असेल तर ती कुंडली बरोबर उत्तर देते. 
३. इच्छित संघ/माणूस जिंकेल का याचे उत्तर सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी देतो. हा उपनक्षत्रस्वामी जर ६ (सातव्याचे व्ययस्थान) किंवा सहयोगी स्थाने १० (कर्तृत्व स्थान), ११ (लाभ, इच्छापूर्तीचे स्थान) यांचा कारक असेल तर इच्छित संघ जिंकतो, नाही तर हरतो.
४. इतर प्रश्नकुंडलीचे नियम उदा. वक्री ग्रहांचे कारकत्व इथेही लागू होतात.

भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारत जिंकेल का हा प्रश्न मला तीन जणांनी वेगवेगळ्या वेळी विचारला. त्या प्रश्नकुंडल्या खाली दिल्या आहेत. त्यांचा क्रमाने विचार करू.

प्रश्नकुंडली १: 18/Mar/2015 16:01:00 पुणे
प्रश्नकुंडली १ मध्ये चंद्र मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रात आहे. तो १, ७, ५, ९, १० या स्थानांचा कारक आहे, सहाव्याचा नाही, त्यामुळे ह्या कुंडलीवरून उत्तर देता येणार नाही असे मी सांगितले. सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी रवि, शनिच्या नक्षत्रात असून शनि वक्री आहे, त्यामुळे जर मी उत्तर दिले असते तर भारत हरेल असे द्यावे लागले असते आणि अर्थातच ते चुकले असते.

प्रश्नकुंडली २: 19/Mar/2015 10:41:00, पुणे
प्रश्नकुंडली २ मध्ये चंद्र राहुच्या नक्षत्रात आहे. तो २, ३, ५, १० या स्थानांचा कारक आहे, सहाव्याचा नाही, त्यामुळे ह्या कुंडलीवरून उत्तर देता येणार नाही असे मी सांगितले.  सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी गुरु वक्री, बुधाच्या नक्षत्रात २, ३, ५, ८, १०, ११ या स्थानांचा कारक आहे. तो १०, ११ चा कारक असल्याने भारत जिंकेल असे उत्तर आले असते, पण गुरु मार्गी झाल्यावर, म्हणजे ९ एप्रिलनंतर. सामना कितीही रंगला तरी तो इतके दिवस नक्कीच चालला नसता, त्यामुळे हे उत्तर हास्यास्पद ठरले असते.

प्रश्नकुंडली ३: 19/Mar/2015 08:49:00, पुणे
प्रश्नकुंडली ३ मध्ये चंद्र राहुच्या नक्षत्रात आणि राहु ६ व्या स्थानात, त्यामुळे प्रश्न बरोबर जुळला. सहाव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी राहु बुधाच्या नक्षत्रात ३, ४, ६, ११ या स्थानांचा कारक आहे, त्यामुळे भारत हा सामना जिंकेल असे सांगितले जे उत्तर खरे आले.  या सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने विकेट फेकल्या आणि बांग्लादेशाच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने धावांमध्ये कंजुषी केली, ती राहुला साजेशी होती.






सट्ट्यासाठी या पद्धतीचा उपयोग होत नाही. सट्टेबाज जेव्हा प्रश्न विचारतो, तेव्हा तो प्रश्न ठराविक संघ/खेळाडू जिंकेल का असा न दिसता, सट्टेबाजाला पैसे मिळतील का असा दिसतो. सट्टेबाजाला जर पैसे मिळणार नसतील, तर त्याने सट्टा लावलेला संघ जिंकत नाही. अशा परिस्थितीत मुळात कुंडलीत प्रश्न दिसत नाही, त्यामुळे ज्योतिषी उत्तर देऊ शकत नाही आणि दिलेच तर ते चुकते.